Shop selling tobacco product | (Photo Credits: Flckr)

महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) येथून पोलिसांनी तब्बल 45 लाखांचा माल जप्त केला असून या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. भिवंडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनवर धाड टाकल्यानंतर आणि अहमदाबाहून मुंबईत येणाऱ्या टेम्पोच्या तपासणीतून हा माल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. (Maharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी)

ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी सेलने भिवंडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनवर धाड टाकली. तिथे त्यांना 4 ट्रॅक भरुन बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. एकूण 37.55 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि इतर आजूबाजूच्या ठिकाणी हा माल पोहचवला जात होता. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून 4 ट्रॅक जप्त करण्यात आले आहेत.

पालघरमध्ये गुटखा आणि इतर तंबाखूच्या पदार्थांची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन्ही शहरांना जोडणार्‍या महामार्गावरून अहमदाबादहून मुंबईत तस्करी केली जात होती. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी मंगळवारी चिल्लर उड्डाणपुलाजवळ टेम्पो रोखला. यात भाज्या आणि पिशव्याखाली लपवून ठेवलेली विविध ब्रँडच्या पॅन मसाल्याच्या पाकिटे सापडली, असे पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले. या टेम्पोतून जप्त करण्यात आलेला माल तब्बल 8.05 लाखांचा होता. या प्रकरणी टेम्पोच्या ड्रायव्हर आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 2012 पासून गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. 2018 मध्ये राज्य सरकारने गुटखा विक्रीला अजामीनपात्र गुन्हा ठरविला आहे. तसंच त्यासाठी 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, राज्य सरकारने सुटी सिगरेट किंवा बिडी खरेदी-विक्रीवरही राज्यात बंदी घातली आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. सुटी सिगरेट आणि बिडी विकत घेणाऱ्या ग्राहकांना सिगरेटच्या पाकीटावर लिहिलेली आरोग्यदायी चेतावणी पाहता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.