Smoking (Photo Credits-Facebook)

राज्यातील धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींसाठी एक वाईट बातमी (Bad News) आहे. यापुढे राज्यात सुटी सिगरेट किंवा बिडी (Loose Cigarettes and Bidi) कोणीही विकत घेऊ शकणार नाही. कारण सुटी सिगरेट किंवा बिडीच्या विक्रीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) निर्बंध लावले आहेत. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात काहीसा गोंधळ उडाला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) या अंतर्गत सेक्शन 7 च्या सब सेक्शन 2 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढत सुटी सिगरेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशावर आरोग्य विभागाचे प्रिन्सिपल सेक्रीटरी डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी स्वाक्षरी केली आहे.

सुटी सिगरेट आणि बिडी विकत घेणाऱ्या ग्राहकांना सिगरेटच्या पाकीटावर लिहिलेली आरोग्यदायी चेतावणी दिसत नाही. सिगरेट आणि बिडीच्या पाकीटावर फोटोग्राफीक स्वरुपात आरोग्यसाठी घातक असलेला मजकूर लिहिलेला असतो. जेव्हा एखादा ग्राहक एक  किंवा दोन सिगरेट वा बिडी विकत घेतो तेव्हा त्याला त्या सिगरेटच्या पाकीटावरील सूचना दिसत नाहीत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (पुणे येथे लॉकडाउनच्या काळात सिगरेट विकणाऱ्या व्यापाऱ्याला अटक करत 39 लाखांचा मुद्देमाल जप्त)

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे डॉक्टरांनी स्वागत केले आहे. तर या निर्णयामुळे ग्राहक आणि विक्रेते संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये सिगरेट ओढण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या परिणाम विक्रेत्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. "प्रत्येकाला सिगरेट किंवा बिडीचे पूर्ण पाकीट विकत घेणे परवडणारे नसते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आमच्या विक्रीवर परिणाम होईल," असे परेल मधील एका सिगरेट विक्रेत्याने म्हटले आहे.