आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet Meeting) पार पडली त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा-1, (हतनूर प्रकल्प), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा 2 हजार रुपये याप्रमाणे, लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8 टक्के वाढ करण्यास व ती 2021-22 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा 12 वरून 20 करण्यास, तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये 1 हजार रुपयांवरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाने आज एक पाऊल पुढे टाकले. या संदर्भात आज मंत्रिमंडळाने निविदा प्रक्रीयेस देखील मान्यता दिली. हा केंद्र शासन पुरस्कृत जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने हाती घेतलेला प्रकल्प आहे.
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रूपये 429-63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना व मॉडेल विधेयकास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्कील इंडियाच्या धर्तीवर ‘कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या संदर्भात ध्येयधोरण निश्चित करतांना राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. (हेही वाचा: Maharashtra Gram Panchayat Elections 2021: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांनाही ग्रामपंचायत निवडणुकीत करता येणार मतदान)
यासह, मंत्रिमंडळ बैठकीत भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग दुर्घटनेबाबत गंभीर चर्चा झाली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सखोल चौकशी सुरू झाली आहे. समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे. ही समिती आता येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल.