ग्रामपंचायत निवडणूक ( Gram Panchayat Elections) म्हणजे एकेका मतांचा खेळ. त्यामुळे प्रत्येक मतदान महत्त्वाचं. असे असताना कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे तर आणखीणच बिकट स्थिती. अशा स्थितीत तुम्ही जर कोरोना व्हायरस संक्रमित असाल तरी घाबरुन जायचं कारण नाही. तुम्हाला अटी आणि शर्थींचे पालन करत ग्रामपंचायत निवडणुकीत (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) मतदान करता येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती, दोन वेळा तपासणी करुनही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा अधिक असलेल्या मतदारांना मतदानाचा कालावधी संपण्याच्या आधी आर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदाराला राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घालून दिलेल्या सर्व नियम आणि उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 या दिवशीच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतू, कोरोना संकटाची स्थिती कायम असल्याने आणि मतदानाची तारीख जवळ आल्याने त्यात निवडणूक आयोगाकडून अधिक सूस्पष्टता आणली जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections 2021: सरपंच पदाचा लिलाव अंगाशी आला, निवडणूक आयोगाने दणका दिला; उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द)
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ समान आहे. अपवाद फक्त गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांचा आहे. या ठिकाणी सकाळी निश्चित वेळेनुसार सुरु झालेले मतदान दुपारी 3.00 पर्यंत सुरु राहणार आहे. तर उर्वरीत सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या कालावधीत सर्वसाधारण मतदार मतदान करु शकणार आहेत. कोरोना व्हायरस संक्रमित किंवा शरीराचे तापमान विशिष्ट तापमानापेक्षा अधिक असलेल्या मतदारांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे.