गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मेघगर्जनेसह मध्यम ते तीव्र गारपिटीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह उद्याही असेच वातावरण असून उद्याही पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. पुण्यात काल संध्याकाळी वादळासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
पुढील 2-3 दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये, गडगडाटी वादळासह, विजा, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 4 दिवसांत तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुढील 3 दिवसात कर्नाटक आणि 14 एप्रिल 2021 रोजी तेलंगणामध्ये पावसाची शक्यता आहे.
देशाच्या बर्याच भागातील वादळी वाऱ्यामुळे, येत्या 4-5 दिवसांत देशाच्या बर्याच भागांत जास्तीत जास्त तापमानात कोणताही उल्लेखनीय बदल होण्याची शक्यता नाही. फक्त गुजरातमध्ये पुढील 2-3 दिवसांत जास्तीत जास्त तापमान 2-3 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टिस्तान, मुझ्झफराबाद आणि हिमाचल प्रदेश येथे तुरळक ठिकाणी गारांचाही अंदाज आहे. 14 आणि 15 एप्रिलला पश्चिम राजस्थानमध्ये मेघगर्जनांची शक्यता आहे. (हेही वाचा: बगाड यात्रेमुळे साताऱ्याच्या बावधनमध्ये उद्भवले कोरोनाचे संकट; ग्रामस्थांनंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांचीही कोव्हीड-19 चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, स्कायमेट वेदरने मंगळवारी 2021 मान्सूनसाठी एक अंदाज जाहीर केला. त्याअंतर्गत स्कायमेट हवामान एजन्सीने सांगितले की, यंदा उत्तम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार भारताच्या नैऋत्य भागात जून ते सप्टेंबर या काळात 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून चांगला राहील, अशी अपेक्षा आहे.