महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) किमान 8 खासदार अजित पवार यांच्यासोबत सामील होण्याची शक्यता आहे. हे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असून, वृत्तानुसार ते पक्षांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत काही माध्यमांनी अहवाल दिले आहेत. ही बाब शरद पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का मानली जात आहे, कारण अजित पवार यांच्या गटाला भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आधीच 'खरा राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले. तसेच त्यांना अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दर्जा देण्यात आला. रिपब्लिकच्या एका अहवालानुसार, पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध अहवालांमध्ये व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
याआधी, 3 जानेवारी रोजी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी फडणवीस हे आतापर्यंत राज्य सरकारचे एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या, ‘महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारायचा आहे. केवळ एकच व्यक्ती जी खूप मेहनत घेत आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी कोणीही दिसत नाही. देवेंद्रजी मिशन मोडमध्ये काम करत आहेत... ही चांगली गोष्ट आहे.. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.’
बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्यानंतर काही दिवसांनी ही पक्षांतराची बाब समोर आली आहे. जर असे घडले तर, हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) युती आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर लढले होते आणि त्यापैकी 8 जिंकण्यात यशस्वी झाले होते.
दरम्यान, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीचे विभाजन झाले, जेव्हा अजित पवार आणि इतर अनेक पक्ष नेत्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून शरद पवार यांच्या भविष्यातील योजनांबाबत अटकळ बांधली जात असून, ते महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा: Beed Sarpanch Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरणाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल CP Radhakrishnan यांची भेट; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी)
(टीप- हा लेख इतर माध्यमांच्या अहवालांवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.)