Eknath Shinde | File Image

महाराष्ट्रात विरोधीपक्ष भाजपा कडून काल  (28 जून) रात्री राजभवनावर  भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांची भेट घेऊन सरकारला बहुमत चाचणी (Floor Test) घेण्याचे आदेश द्यावेत याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी आज पत्र जारी करत 30 जूनला विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या  चाचणीला सामोरं जाण्यासाठी गुवाहाटीमध्ये असलेला बंडखोर आमदारांचा गट दाखल होणार असल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

आज सकाळी गुवाहाटी हॉटेलच्या रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडत एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. 4 आमादारांसह त्यांनी पूजा केली. या देवदर्शनानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन तिच्याकडे महाराष्ट्राच्या सुख समाधाना साठी प्रार्थना केली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी आपण सार्‍या आमदारांसोबत बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेले आमदार 20 जूनच्या रात्रीपासून मुंबईबाहेर आहेत. सुरूवातीला हे आमदार सुरत मध्ये होते. सुरतेमधून त्यांनी गुवाहाटी गाठले. सध्या एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांची संख्या 39 शिवसेना आमदार आणि 9 अपक्ष अशी आहे. त्यामुळे हे आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस काय भूमिका घेणार याकडे सार्‍यांचे लक्ष आहे. शिवसेनेच्या दाव्यानुसार महाविकास आघाडी मजबूत आहे. पण येणारा काळच आता सारी उत्तरं देणार आहे.

30 जूनला सकाळी 11 वाजता विधिमंडळात बहुमत चाचणी होणार आहे. सारे आमदार उपस्थित असल्यास बहुमताचा आकडा 144 आहे. त्यामुळे या जादुई आकड्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणती राजकीय समिकरणं मांडली  जातात याकडे सार्‍यांंचे लक्ष असणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोरांनी महाविकास आघाडीत शिवसेनेने कॉंग्रेस, एनसीपीची साथ सोडावी अशी मागणी करत बंड पुकारलं आहे. त्यामुळे ही आघाडी टिकणार की शिवसेना भाजपा सोबत पुन्हा नवी चूल मांडणार याबाबत उत्सुकता आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे गट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.