राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र दिल्याचे वृत्त आहे. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान मातोश्री आणि कार्यालयातही हे पत्र पाठविले आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध (Floor Test) करण्यासाठी दिलेल्या पत्रात किती तासांची मुदत आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण आपल्या सर्व समर्थक आमदारांसह बहुमत चाचणीला सामोरे जाण्यासाठी उद्या (30 जून) मुंबईला पोहोचतो आहोत असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला येत्या 24 तासात बहुमत सिद्ध करावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्यपालांच्या पत्राचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात, येत्या 24 तासात ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करावे असे राज्यपालांनी म्हटले आहे. विधिमंडळात बोलावलेले अधिवेशन केवळ बहुमत सिद्ध करण्यासाठी असेल. हे सत्र उद्या (30 जून) सकाळी 11 वाजता सुरु होईल, असे म्हटले आहे. याशिवाय सकाळी 11 वाजलेपासून सुरु झालेले हे अधिवेशन केवळ पाच वाजेपर्यंतच संपवायचे आहे. म्हणजेच सकाळी 11 वाजलेपासून सुरु झालेल्या अधिवेशनात पुढचे काहीच तास ठाकरे सरकारकडे असणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: विधिमंडळात बहुमत चाचणी घ्या, एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान)
ट्विट
🔴 #MaharashtraPoliticalCrisis | Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari sends a letter to the secretary of the Maharashtra legislative assembly, floor test tomorrow pic.twitter.com/oD2h5wvZzr
— NDTV (@ndtv) June 29, 2022
दरम्यान, पाठीमागील एक आठवड्यापासून गुवाहाटी येथील रेडसन ब्लू हॉटेलमध्ये थांबलेला शिवसेना बंडखोरांचा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) अखेर बाहेर पडला आहे. या गटात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांचा समावेश आहे. हा सर्व गट नेमका कोठे निघाला आहे याबाबत उत्सुकता आहे. आज सकाळीच गाड्यांचा एक मोठा ताफा हॉटेलमधून बाहेर पडला. हे आमदार कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे गट हॉटेलमधून बाहेर पडल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गट आजच मुंबईत दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सांगितले जात आहे की, गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शिंदे गट आज दुपारी 12 वाजता मुंबईला रवाना होईल, असे समजते. दरम्यान, आम्ही उद्या बहुमत चाचणीसाठी राज्यात दाखल होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.