Maharashtra Police: पोलीस शिपाई होणार PSI, गृहविभागाचा प्रस्ताव; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात शिपाई (Police Constable) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्त होताना आता थेट पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे. अनेकांना हे काहीसे आश्चर्यकारक वाटत असले तरी असे होऊ शकते. राज्याचे गृहमंत्रालय तसा प्रस्ताव तयार करत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी तशी माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या तमाम कर्मचाऱ्यांना एक नवी संधी निर्माण होऊ शकणार आहे. अर्थात हा प्रस्ताव विधिमंडळातून मंजूर झाल्यानंतरच.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली''.

राज्याचे पावसाळी अधिवेशन यंदा दोन दिवसांचेच होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे हा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा हे अधिवेशन 5 आणि 6 जुलै या कालावधीत पार पडत आहे. दरम्यान, संबंधित प्रस्तावावर अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात एक मंत्रिमंडळ बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात येईल, दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस सेवेत एखादा तरुण/कर्मचारी पोलीस शिपाई म्हणून भरती झाला. तर त्याला निवृत्तीपर्यंत विशिष्ट पदापर्यंत पोहोचता येते. त्यासाठी पदसंख्या, आरक्षण, पात्रता यासोबतच इतरही अनेक निकष लागू असतात. हे निकष तर लागू असतीलच. परंतू, त्याही पुढे जान पोलीस शिपायाला निवृत्त होतोना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे यासाठी राज्याचा गृहविभाग एक प्रस्ताव तयार करत आहे.