Kalyan Crime: मराठी युवकाचा अपमान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांची मारहाण
Crime (PC- File Image)

राज्यात मराठी आणि परप्रांतीय हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. काही दिवसापुर्वीच मुलुंडमध्ये मराठी दाम्प्त्याला कार्यालयाची जागा नाकारणे आणि कांदिवलीमध्ये मराठी व्यक्तीवर जय श्रीरामची घोषणा देण्यासाठी मारहाण अशा घटना घडल्या होत्या. यातच कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अशीच घटना घडली आहे.  कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर फेरिवाल्यांकडून खरेदी केलेली वस्तु खराब असल्याने ती परत करत एका तरुणाने पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार देत ‘तुम्ही मराठी लोक असेच असतात’ अशी उपरोधिक शब्दात फेरिवाल्याने टिपण्णी केली. यावरून झालेल्या वादानंतर मनसैनिकांनी घटनास्थळी येऊन फेरीवाल्यांना चोप दिला. (हेही वाचा -Mumbai Shocker: महिलेचा पतीवर मारहाण, घरातील सर्व कामे करायला लावल्याचा आरोप; मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर)

शहापूर तालुक्यातील वासिंद भागात राहणारा एक मराठी तरूण कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. काम आटोपल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने घरी जाणार होता.  कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका फेरीवाल्याकडून तरुणाने एक वस्तू पैसे देऊन खरेदी केली. ती वस्तू खराब वाटली म्हणून तरुणाने ती परत करुन फेरीवाल्याकडून पैसे परत मागितले.  या नंतर या परप्रांतीय फेरीवाल्याने  या तरुणाला उद्देशून ‘मराठी लोक असेच असतात,’ अशी उपरोधिक शब्दात टिपण्णी केली. तरुणाने फेरीवाल्यांना तुम्ही मराठीचा उल्लेख येथे कशासाठी करता. तु मला बोल, असे सांगितले.

यानंतर या दोघांमधील वाद हा वाढत गेला आणि या ठिकाणी इतर परप्रांतीय फेरीवाल्यांने या तरुणाला धमकी देण्यास सुरुवात केली. यावेळी  तरुणाने कल्याण पूर्वेतील मनसे शाखेत जाऊन घडला प्रकार तेथे उपस्थित मनसैनिकांना सांगितला. शाखेतील चार ते पाच मनसैनिक तात्काळ रेल्वे स्थानकात आले. त्यांनी हुज्जत घालणाऱ्या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. या घटनेनंतर स्कायवॉकवरील इतर फेरीवाले तेथून पळून गेले.