महाराष्ट्र (Maharashtra) राज्य हे कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत सर्वात प्रभावित राज्य आहे. या विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे वाढण्यास सुरुवात झाल्यावर देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात हळू हळू यामध्ये शिथिलता आणली गेली. काल महाराष्ट्र सरकारने 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अजूनही सिनेमागृहे, नाट्यगृहे यांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आता, राज्यातील सिनेमागृहे (Multiplex) आणि नाट्यगृहे (Theaters) सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Cultural Affairs Minister Amit Deshmukh) यांनी दिली.
महाराष्ट्रात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्यासाठी अमित देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी ते म्हणाले, ‘जवळपास सहा महिन्यांपासून राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद आहेत. येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरु करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.’ (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी)
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद असल्याने थिएटर्स मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना येत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. थिएटर्स सुरु राहण्याबाबतचे लायसन्स, वेगवेगळया परवानग्या यासारखे विषय प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येईल असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी थिएटर्स ओनर्स यांना आश्वस्त केले.