Lok Sabha Election Results 2024 In Theaters: देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) सातही टप्पे संपल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती निकालांची. उद्या, 4 जून रोजी हे निकाल समोर येणार आहेत. भारतात कोणाचे सरकार स्थापन होणार हे येत्या काही तासांतच ठरणार आहे. अशात नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या अनोख्या उपक्रमात, महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे थेट निकाल दाखवणार आहेत.
हा अभिनव उपक्रम मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये चालवला जाईल. या ठिकाणी अनेक चित्रपटगृहे मोठ्या पडद्यावर लोकसभा निवडणूक निकाल प्रसारित करतील. मुंबईतील सायनमधील मूव्हीमॅक्स चेन हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची स्क्रीनिंग करणाऱ्या प्रमुख स्थानांपैकी एक असेल. उद्या देशभरात मतांची मोजणी होणार आहे.
पेटीएम (PayTm) नुसार, एसएम5 कल्याण, इटर्निटी मॉल ठाणे, कांजूरमार्ग, वंडर मॉल ठाणे, मीरा रोड आणि सायनमधील मुव्हीमॅक्स (MovieMax) चेन यासह क्षेत्रातील विविध चित्रपटगृहे या अनोख्या उपक्रमात भाग घेतील.
चित्रपटगृहांमध्ये निवडणुकीच्या निकालांचे थेट प्रसारण सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि सहा तास चालेल. त्या दिवशी, थिएटरमध्ये निवडणूक निकाल पाहण्यासाठी तिकीटाची किंमत 99 ते 300 रुपयांपर्यंत असेल. मुंबईसोबतच हा उपक्रम राज्यातील इतर शहरांमध्येही राबवला जाईल. पुण्यात, मूव्हीमॅक्स अमानोरा थिएटरचे निकाल प्रदर्शित केले जाणार आहेत. नाशिकमधील लोक कॉलेज रोडवरील द झोनमध्ये हे निकाल पाहू शकतात, तर नागपुरातील लोक मूव्हीमॅक्स इटर्निटी नगर येथे निकाल पाहू शकतात. (हेही वाचा: Election Commission of India: निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची माहिती, देशात 39 ठिकाणी फेरमतदान)
पारंपरिक पद्धतीने निवडणूक निकाल पाहण्याच्या पद्धती दूर करणे आणि समुदाय-आधारित अनुभव तयार करून निवडणूक निकाल अधिक आकर्षक, मनोरंजक बनवणे हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. मात्र काहींनी चित्रपटगृहात निवडणूक निकालांचे थेट प्रक्षेपण केल्याने संभाव्य तोडफोड आणि व्यत्ययाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.