Maharashtra Kisan Morcha 2019: वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलेल्या वचनांनी पूर्तता न झाल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 27 फेब्रुवारी दिवशी सुमारे 40,000 हजाराहून अधिक शेतकरी विधानसभेवर धडकणार आहेत. आज (20 फेब्रुवारी) पासून नाशिक ते मुंबई लॉंग मार्चला सुरूवात होणार आहे. ऑल इंडिया किसान सभा (All India Kisan Sabha), किसान महासभेच्या नेतृत्त्वाखाली हा लॉंग मार्च पुन्हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे.
27 फेब्रुवारी दिवशी शेतकरी मुंबईमध्ये पोहचणार असले तरीही मुंबई पोलिसांनी या लॉंग मार्चला परवानगी नाकारली आहे. मुंबई नाका परिसरामध्ये धरणं- आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. किसान सभेचे अनेक प्रमुख नेते सध्या भूमिगत झाले आहे. ठाणे, पालघर येथील शेतकरी काही दिवसांनी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.
काय आहेत शेतकर्यांच्या मागण्या?
- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करणं
- कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमुक्ती द्या
- शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
- वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
- बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई द्या
- वीजबिल माफ करा
- दुधाला किमान 40 रुपये प्रतिलीटर भाव
6 मार्च 2018 दिवशी सुमारे 30,000 शेतकरी मुंबईमध्ये धडकले होते. त्यावेळेस कर्जमाफी आणि इतर मागण्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने आता शेतकर्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.