Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

कर्नाटक Karnataka) आणि महाराष्ट्रात भाषेवरून सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. आधी कर्नाटक राज्य परिवहनच्या बस कंडक्टरवर भाषेवरून हल्ला झाला, व त्यानंतर महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांना काळे फासले गेले. या घटनेनंतर दोन दिवसांनी, परिस्थिती सुधारेपर्यंत दोन्ही राज्यांनी सरकारी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत.  महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की, चालक आणि वाहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एमएसआरटीसी बसेस अनिश्चित काळासाठी बंद राहतील.

सरनाईक म्हणाले, ‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बस कर्मचाऱ्यांवर हे हल्ले का करण्यात आले हे स्पष्ट करावे आणि या मुद्द्यांवर चर्चा करावी.’ त्याच वेळी, एमएसआरटीसीचे महाव्यवस्थापक नितीन मैंद म्हणाले की, दोन्ही बाजूंकडून खूप आक्रमकता असल्याने ऑपरेशन्स कधी सुरू होतील हे सध्या सांगणे कठीण आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार कर्नाटकात जाणाऱ्या बस सेवांमध्ये सुरक्षा प्रदान करण्याचा विचार करत आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी सांगितले की ते कर्नाटक राज्यात जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसमध्ये सुरक्षा मार्शल किंवा पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच पोलीस बंदोबस्तात या बसेस सुरु होऊ शकतात. सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या 250 आणि पुण्यातून जाणाऱ्या आठ ते नऊ बस बंद आहेत.

अहवालानुसार, शुक्रवारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावी येथे मारहाण करण्यात आली होती. मराठी येत नसल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा कंडक्टर महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी यांनी केला होता. या घटनेनंतर कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. तसेच शनिवारी (22  फेब्रुवारी 2025) चित्रदुर्गात कन्नड संघटनेतील काही लोकांनी महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांना कन्नड येत नसल्याने काळे फासले. याचा निषेध म्हणून शनिवारी पुण्यातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसवर काळी शाई फेकली. याशिवाय, कोल्हापुरात कर्नाटकच्या दुसऱ्या बसवरही भगवा झेंडा फडकवण्यात आला. (हेही वाचा: School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी)

त्यानंतर सरकारने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द केल्या. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद करण्यात आली आहे. आता, काही दिवसांनी दोन्ही राज्यांकडून बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची या परिस्थितीसंदर्भात आणि बससेवा तातडीने सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांत सुरळीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत.