
मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेची सूत्रे हाती येताच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचा धडाका उडवला आहे. मंत्रालयात कमी आणि उद्घाटन, सत्कारसंमारंभ आदींना जास्त अशीच एकनाथ शिंदे यांची आतापर्यंतची तरी कामगिरी राहिली आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने विविध मंडळांची निमंत्रणे स्वीकारुन मुख्यमंत्री शिंदे यांनी गणपती आरती आणि गणपती मंडळांना भेटी देण्याचा सपाटाच लावला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उलवली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी याला प्रत्युत्तर दिले खरे. परंतू, गणेशोत्सवात राजकीय टीका युद्ध शिगेला (Maharashtra in Politics) पोहोचल्याचेच पाहायला मिळाले.
राज्याला दोन मुख्यमंत्री हवेत- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले की, राज्याला दोन मुख्यमंत्री असायला हवेत. एक मंत्रालयात बसून जनतेची सेवा करेण. महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावेल. जेणेकरुन समस्यांचे निराकरण होईल. त्याच वेळी दुसरा मुख्यमंत्री सतत सत्कार, कार्यक्रम विविध गाठीभेटी घेऊन सातत्याने सेल्फी आणि फोटो काढेन. एकाच मुख्यमंत्र्यांवर दोन्ही कामे असल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबीत राहिले आहेत. (हेही वाचा, Pune Ganpati Visarjan 2022: चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्र 'गणपती बाप्पा मोरया'; गणेशविसर्जन मिरवणुकीत दोघांकडून पालखीला खांदा)
जाईन तेथे कॅमेरा नेतात- अजित पवार

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही सत्तेत होतो. पदेही भुषवली. पण कधी कॅमेरा सोबत नेला नाही. आजकाल काही लोक आहेत. जे जिथे जाईल तिथे कॅमेरा घेऊन जातात. कॅमेरा दिसला की थांबतात, गाडीतून उतरतात. कॅमेरा असल्याशिवाय आणि फोटो काढल्याशिवाय यांचे कामच होत नाही. त्यांना चैनच पडत नाही, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
गणेशोत्सव संपल्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेशविसर्जनादिवशी मुख्यमंत्र्यांना जोरादर टोला लगावला आहे. पाठिमागील काही दिवस गणेशोत्सवामुळे मुख्यमंत्री कामात व्यग्र होते. त्यांना विविध गणपती मंडळांना भेटायचे होते. आता गणपती विसर्जन झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना फुरसत मिळेल. या दहा दिवसात आणि त्याअगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही. तो आजही मदतीच्या अपेक्षेत आहेत. सरकार त्यावर विचार करेल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
कॅमेरा नेता येईल अशाच ठिकाणी मी जातो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती आहे. त्यामुळे लोकांना मी आपला वाटतो. लोक माझ्याकडे येतात. फोटो काढतात. माझ्याकडे कॅमेरा असत नाही. लोक माझ्यासोबत फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात. ज्यांच्याकडे जावे वाटते त्यांच्याकडेच लोक जातात. त्यामुळे लोक माझ्याकडे येतात. इतरांकडे का जात नाहीत त्याचे उत्तर मला देता येणार नाही. परंतू, आज मी लोकांमध्ये फिरतो आहे. त्यामुळे इतर लोकही आता लोकांना भेटू लागले आहेत. माझ्या फिरण्यामुळे त्यांनाही पुण्य मिळत आहे. अशा लोकांबद्दल मी काय बोलणार. आपली संस्कृती आहे. लोकांना मी त्यांचा वाटतो. त्यामुळे लोक माझ्याकडे येतात, असेही एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.