Answer Sheets Burnt | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC Board Exam 2025) नुकत्याच पार पडल्या. परीक्षा देऊन विद्यार्थी निकालांच्या प्रतिक्षेत असताना शिक्षक मात्र उत्तरपत्रिका तपासण्यात मग्न आहेत. दरम्यान, मुंबईजवळील विरार (Virar) येथून पुढे आलेल्या धक्कादायक घटनेत चक्क या परीक्षेतील काही परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकाच जळून खाक (HSC Answer Sheets Burnt) झाल्या आहेत. सदर घटना, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात घडल्याचे समजते. एका महिला शिक्षकाने या उत्तरपत्रिका तपसण्यासाठी घरी आणल्या होत्या. दरम्यान, तिच्या घराला आग लागल्याने घरातील सामानासह उत्तरपत्रिकांचीही होळी झाली. धक्कादायक म्हणजे, धावत्या एसटी बसमध्ये पेपर तपासत असलेल्याची घटनाही एका व्हिडिओद्वारे नुकतीच व्हायरल झाली होती.

बंद घरास आग, उत्तरपत्रिका जळून खाक

विरार येथील या महिला शिक्षकाने या उत्तरपत्रिका फेरपडताळणीसाठी आपल्या घरी आणल्या होत्या. दरम्यान, ही शिक्षक आणि तिच्या घरातील लोक घर बंद करुन बाहेर गेले होते. दरम्यान, घरामध्ये आग लागली आणि आगीमध्ये घरातील इतर सामान सोफ्यावर ठेवलेल्या उत्तरपत्रिकांसह जळून खाक झाले. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागली असावी, असे सांगितले जात आहे. (हेही वाचा, HSC Answer Paper Kamothe: कामोठे बस स्टँड परिसरात सापडले एचएससी बोर्ड परिक्षा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा)

जळालेल्या उत्तरपत्रिकांच्या संख्येबाबत अनिश्चितता

विरारमध्ये राहणारी ही महिला शिक्षक नेमकी कोणत्या महाविद्यालयात शिकवते किंवा तिच्याकडे नेमक्या इयत्ता बारावीच्या कोणत्या   शाखेच्या उत्तरपत्रिका तपासण्यास आल्या होत्या, त्यांची संख्या किती होती, याबाबत नेमकी माहिती पुढे आली नाही. मात्र, सदर शिक्षकाकडे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी आल्या होत्या. दरम्यान, तिच्या घराला आग लागल्याने त्या जळून खाक झाल्या. उत्तरपत्रिका जळाल्याची घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Biometric Attendance For Std XI, XII Atudents: अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी; NEET, JEE आणि MHT-CET वाल्यांना दणका)

दरम्यान, इयत्ता बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. त्यामुळे या परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी शिक्षण मंडळाची यंत्रणा अतिशय दक्षपणे काम करत असते. त्यातच या उत्तरपत्रिका ज्या शिक्षकांना तपासण्यासाठी देण्यात येतात त्यांना त्या उत्तरपत्रिका शाळेत जाऊनच तपासाव्या लागतात. परंतू, असे असले तरी, अनेक शिक्षक या उत्तरपत्रिका घरी घेऊन जातात. नियमाने या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाता येतात का? त्या घरी घेऊन जाता येत असले तरी, त्या उत्तरपत्रिकांची सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते का? यांसह इतर अनेक सवाल निर्माण झाले आहेत. घडल्या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, बोलींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे म्हटल आहे.