Maharashtra Health Minister Rajesh Tope's Mother Death (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (Shardatai Tope) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. शारदाताई यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी 9 वाजता उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजेश टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले आहे. त्यांच्यावर रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील पार्थपूर या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली जाहीर केली आहे, त्याचे पालन करूनच अंत्यसंस्कार केले जातील, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे यांच्या मातोश्री 74 वर्षाच्या होत्या. तसेच त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने एमएमआरडीएचे संचालक कुलवेंद्र सिंह कपूर यांचा मृत्यू

राजेश टोपे यांचे ट्वीट- 

राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.