Bhagat Singh Koshyari Express Displeasure To CM Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर राज्यपालांचा आक्षेप
Bhagat Singh Koshyari,Kangana Ranaut, CM Uddhav Thackeray (PC -PTI, Instagram)

Bhagat Singh Koshyari Express Displeasure To CM Uddhav Thackeray: अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीदेखील उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना म्हटलं आहे. यासंदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिलं आहे.

कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यामुळे शिवसेने कंगनाला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर कंगना आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वाद झाला. कंगनाने शिवसेनेला 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत असल्याचं म्हणत कुणाची हिंमत असेल, तर रोखून दाखवा, असं आव्हान केलं होतं. त्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. (हेही वाचा - Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत)

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनात बोलावून घेत नाराजी व्यक्त केली. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असंदेखील राज्यपालांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान यासंदर्भात राज्यपाल आज केंद्र सरकारला अहवाल पाठवण्याची शक्यता आहे.

याशिवाय कंगनाने आजदेखील मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. 'तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल. माझ तोंड बंद करू शकता, परंतु, माझ्यानंतर माझा आवाज लाखों लोकांमध्ये दिसेल. तेव्हा किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचे आवाज दाबाल? कधीपर्यंत सत्यापासून दूर जाणार? तुम्ही केवळ वंशवादाचा एक नमुना आहात,' असं कंगनाने आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यावर टीका करताना म्हटलं आहे.