मुंबई व उपनरांतील शालेय शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षकमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसंच यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दिवाळीनंतर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करणार असल्याचे यापूर्वी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात इयत्ता 9 आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येतील. इयत्ता 1 ते 8 साठी शाळा लगेचच सुरु केल्या जाणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु राहतील, अशी माहिती यापूर्वी शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली होती, तसंच 50% शिक्षक क्षमतेवर शाळा सुरु करण्यात येणार असून त्यांच्यासाठी विशेष नियमही लागू करण्यात येणार आहेत. (SSC, HSC Exams 2021 मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)
वर्षा गायकवाड ट्विट:
राज्य सरकारच्या वतीनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.@Central_Railway@WesternRly pic.twitter.com/YLYsGWjb5o
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 11, 2020
शालेय शिक्षकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाली असली तरी अद्याप सर्वसामान्यांच्या प्रवासाबद्दल राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र मिशन बिगेन अगेनच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र धार्मिक स्थळं, मंदिरं, प्रार्थना स्थळे यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शुभसंकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी बोलताना दिले होते.
काल संध्याकाळपर्यंत राज्यात 92,461 अॅक्टीव्ह रुग्ण होते. तर 10769 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,88,091 इतकी असून रिकव्हरी रेट 91.96% इतका आहे. ही परिस्थिती दिलासादायक असली तरी सणासुदीच्या काळात कोविड-19 संसर्ग वाढणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.