Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर Indian School Certificate Examination (ICSE) बोर्डाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. असे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आज (24 जून) बॉम्बे हायकोर्टाला (Bombay High Court) सांगितले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 1,39,010 वर पोहचला असून दिवसागणित त्यात मोठी भर पडत आहे. तर राज्यात एकूण 6,531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मार्च मध्ये देशव्यापी लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे रद्द झालेल्या 10 वी आणि 12 वीच्या ICSE च्या परीक्षा 2 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान घेण्यात याव्या, असा निर्णय ICSE बोर्डाने यापूर्वी घेतला होता. दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे राज्यातील ICSE च्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारकडे आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात हायकोर्टाला दिली होती. तसंच बोर्डाच्या परीक्षांमध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग असेल यानुसार यापुढील निर्णय घेण्यात यईल, असे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी यांनी यापूर्वी सांगितले होते.

राज्यात कोरोना व्हायरसचे संकट अजूनही दाट आहे. त्यामुळे राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांचे गुण हे पूर्वीच्या सत्रातील गुणांच्या सरासरीनुसार देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपण अधिक चांगले गुण मिळवू शकतो असा आत्मविश्वास आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पत्राद्वारे आक्षेप नोंदवला होता.