महाराष्ट्राच्या 50-50 सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम; नव्या प्रस्ताव येणार-जाणार नाही: संजय राऊत
Shiv Sena | Photo Credits: Twitter/ ANI

Maharashtra Government Formation:  महाराष्ट्रामध्ये आज (6 नोव्हेंबर) विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर 12 दिवस उलटले असले तरीही सत्ता संघर्ष कायम आहे. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत सद्य स्थितीवर नियमित एक ट्विट करत आहे. आज त्यांनी 'जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है' अशाप्रकारचे ट्वीट केले आहे. दरम्यान शिवसेना- भाजपा यांच्या युतीमध्ये सत्ता वाटपावरून अजूनही रस्सीखेच कायम आहे. तर आज सकाळी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचाच हे विधान अधोरेखित केलं आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ताठर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नागपूर: देवेंद्र फडणवीस RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला, नितीन गडकरी यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार त्यामुळे ठरलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना जो फॉर्म्युला ठरला होता त्यावरच चर्चा केली जाईल असं म्हटलं जात आहे. परंतू काही मीडीया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, शिवसेना उपमुख्यमंत्रीपदासह 16 महत्त्वाची पदं स्वतःच्या पदरात पाडून घेऊन पुन्हा शिवसेना - भाजपा युती सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे.

संजय राऊत ट्वीट 

ANI Tweet

महाराष्ट्रातील 13 वी विधानसभा येत्या 9 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. त्यामुळे मतदारांनी दिलेल्या कौलनुसार, वेळेत सत्ता स्थापन करून मंत्र्यांच्या शपथविधी पार न पडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. दरम्यान राज्यात तशी स्थिती निर्माण झाली तर त्याला शिवसेना जबाबदार नाही असेही संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेदरम्यान म्हटलं आहे.

24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजपाला राज्यात 105 तर शिवसेनेला 56 विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला आहे. यानंतर सत्तेत समान वाटप व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे.