Sharad Pawar (Photo Credits: IANS)

Maharashtra Government Formation 2019: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)  यांच्या नावावर सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर दिली. मात्र उद्धव यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. अजूनही बैठक सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. "मला अर्धवट माहिती द्यायची नाही. जेव्हा आम्हाला काही सांगण्यासारखं असेल तेव्हा तीनही पक्ष सांगू. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देऊ", असं उद्धव म्हणाले.

सत्तास्थापनेविषयीचे सविस्तर निर्णय ठरल्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ, असं पवार म्हणाले. दरम्यान सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना उद्याच जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय संमती मिळाली, असं शरद पवार म्हणत असले, तरी स्वतः उद्धव यांचा निर्णय झाला की नाही, हे स्पष्ट नाही.

हेदेखील वाचा- महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत आज होणार घोषणा? 'या' असतील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

तसेच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा सकारात्मक झाली असून उद्यापर्यंत अंतिम निकाल येईल असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

या बैठकीसाठी काँग्रेसकडून दिल्लीतील नेते मलिक्कार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.