Maharashtra Coronavirus Restriction Free: महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

गुढीपाडवा (Gudi Padwa) सणाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व कोरोना निर्बंध सरकारने काढून टाकले (Maharashtra COVID-19 Restriction Free) आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात साजऱ्या होणाऱ्या सर्व सण, उत्सव आणि सार्वजनिक उपक्रमांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, मराठी नववर्षाच्या निमित्ताने महाविकासआघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) मोठा निर्णय घेत नागरिकांना गुढी पाडव्याची भेट दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातूनही याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबाबत माहिती देताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना आव्हाड यांना मास्कबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांना मास्क वापरायचा त्यांनी वापरावा. ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरु नये.

ट्विट

कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक होते. त्यामुळे सहाजिकच राज्य सरकारने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर लावले होते. प्रामुख्याने सण, उत्सव, आणि सार्वजनिक कार्यक्रम यांवर विशेष बंधणे होती. राज्यातील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, लग्नसमारंभ आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या सर्व कार्यक्रमांवर बंधणे होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्बंधावर विरोधी पक्षासह राज्यातील अनेक नागरिक, व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती.