काँग्रेस (Congress ) सोडून भाजप (BJP) खासदार झालेले नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप सोडून काँग्रेस पक्षात पुनरागमन का केले? हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी प्रथमच याविषयी भाष्य केले. यात त्यांनी भाजप खासदार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्याशी नेमके भांडण काय झाले? याबाबतही सांगितले. काही झाले तरी भाजप आणि सरकारसोबत संघर्ष झालाच असता. हा संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत झाला इतकेच, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
एबीपी माझा या वृत्तवाहीणीसोबत बोलताना नाना पटोले यांनी हा किस्सा सांगितला. नाना पटोले म्हणाले लोकसभा निवडणूक 2014 मध्ये मी भाजप खासदार झालो. केंद्रात भाजपची सत्ता आली. अल्पावधीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जीएसटी (वस्तू सेवा कर) लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांची एक बैठक घेतली. या बैठकीतच नाना पटोले यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भांडण झाले. ज्यामुळे पटोले थेट भाजपला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले.
काय झालं पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या त्या बैठकीत?
नाना पटोले यांनी सांगितले की, भाजप खासदारांची बैठक सुरु असताना प्रत्येक खासदाराला बोलण्याची संधी दिली जात होती. नोटबंदी आणि जीएसटी यांबाबत जनतेत कसा प्रतिसाद आहे हे विचारले जात होते. अनेक खासदार आपापली मतं सांगत होते. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश असे काही मध्य भारतातील खासदारही होते. मी पाहा होतो. बैठकीत अनेक खासदारांना अपमानीत केले जात असे. माझ्या बाजूला खासदा प्रल्हाद पटेल होते. मी त्यांना म्हणालो 'ये ठीक नही है... ये सब क्या चल रहा है...ये भी खासदार है.. सिर्फ प्रधानमंत्री बन गये है.. बाकी फर्क क्या है... फिर भी ये ऐसा क्यू?' यावर प्रल्हाद पटेल म्हणाले 'शांती रखीये.... नही तो गडबड हो जायेगी.' नंतर बोलण्यासाठी माझा नंबर आला.
नाना पटोले यांनी पुढे सांगितले की, जेव्हा मी बोलायला उभा राहिला तेव्हा मी सांगितले 'जीएसटीच्या माध्यमातून आपण लोकांच्या खिशातून पैसे काढतो. नोटबंदीतमध्ये सर्व काही 50 दिवसांमध्ये ठिक होणार होते. परंतू, काय झाले ते झाले. पण आता किमान आपण शेतकऱ्यांसाठी तरी काही करायला हवे. यावर त्यांनी मला विचारले तुम्हाला माहिती आहे का आपण शेतकऱ्यांसाठी काय करतो? यावर मी म्हणालो होय, मला माहिती आहे. कारण मी शेतकरीच आहे. काही गोष्टींवरील अनुदान वगळता आपण त्यांना काही देत नाही. यावर त्यांनी माझ्याकडे खालून वर पाहिले. पुढे मी म्हणालो ओबीसींसाठी एक स्वतंत्र मंत्रालय हवे. यावर ते (पंतप्रधान) माझ्यावर भयंकर चिडले. ते म्हणाले मी एकेक मंत्रालय कमी करतो आहे. तुम्ही वाढवायचे सांगताय.'
नाना पटोले यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या बैठकीत वातावरण एकदम गंभीर झाले. तापले. पण, हा संघर्ष आज ना उद्या होणारच होता. बैठकीत जरी हा संघर्ष झाला नसता तरी लोकसभा सभागृहात झालाच असता. कारण जे चुकीचे आहे त्यावर मी बोललोच असतो आणि बोललोसुद्धा.