Sharad Pawar | (Photo Credit-Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: 'तुम्ही पैलवान असाल तर, मी महाराष्ट्राच्या कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोला लगावला. सातारा येथे भर पावसात दमदार सभा घेतल्यानंतर शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड (Karjat Jamkhed assembly constituency) येथे सभा घेतली. या सभेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद लाभला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टोलेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात तब्बल 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली आहे. 21 तारखेनंतर आता ते म्हणतील आता राम राहीला नाही, असा टोलाही पवार यांनी राम शिंदे यांना या वेळी लगावला. तसेच, तरुणांनी भाजपच्या नेत्यांची झोप उडवली, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

या वेळी बोलताना येत्या 21 तारखेला आपल्याला परिवर्तन करायचे आहे. भाजप सरकारच्या काळात देशात मंदीआली. आता एकदा रोहित पवार यांना संधी द्या. मी जेव्हा बारामतीचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली तेव्हा, बारामती अगदी साधे गाव होते. आज जी बारामती दिसते आहे तशी बारामती नव्हती. परंतू, हळूहळू मी बारामतीत विकास आणला. आता रोहितही कर्जत जामखेडचा चेहरामोहरा बदलून टाकेल, अशी भावनिक साधही शरद पवार यांनी उपस्थितांना घातली. (हेही वाचा, साताऱ्यात वरूणराजासोबत बरसले 'साहेब'; सोशल मिडीयावर शरद पवार यांच्या अचाट जिद्दीचे कौतुक, पहा Twitter Reactions)

शरद पवार यांच्या सभेत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या वाक्यागणीत उपस्थितांतून टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. भाजप शिवसेना युतीविरोधात शरद पवार हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून एकाकी किल्ला लढवत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.