
Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढण्यासाठी भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) युतीचे सूत्र नक्की झाल्याचे समजते. दोन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मतभेद होते. अखेर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार भाजप 144 तर शिवसेना 126 जागांवर लढण्यास राजी झाली असून, उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भाजपच्या कोअर कमीटीची बैठक दिल्लीत पार पडली असून, या बैठकीत हे सूत्र ठरल्याचे समजते. तसेच, येत्या एक दोन दिवसांमध्ये युतीची घोषणा शिवसेना, भाजपचे नेते संयुक्तरित्या करतील, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: भाजपकडून 126-162 महायुतीचा फॉर्म्युला सेट? शिवसेना राजी! - सूत्र)
एएनआय ट्विट
Delhi: Maharashtra BJP Core Group Meeting with BJP President Amit Shah & Working President JP Nadda is underway. pic.twitter.com/wJrsOgx24p
— ANI (@ANI) September 26, 2019
गेल्या काही काळापासून शिवसेना-भाजप या दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडत होत्या. दोन्ही पक्षातील एक गट युती होण्याबाबत ठाम विश्वास व्यक्त करत होता. तर, दुसरा गट जागावाटपाचा मुद्दा पुढे करत युतीत खोडा पडेल अशी विधाने करत होता. दोन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते मात्र युतीबाबत ठाम होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील युतीबाबत ठाम विश्वास व्यक्त करत जाहीर विधान करत होते.