Maharashtra Assembly Elections 2019: भाजपकडून 126-162 महायुतीचा फॉर्म्युला सेट? शिवसेना राजी! - सूत्र
BJP Shiv Sena Alliance | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: अनेक आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे, झाल्यावर चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, महायुतीचा जागावाटपाचा महायुती फॉर्म्युला अखेर नक्की झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गृहमंत्री तसेच, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे येत्या 22 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी संयुक्तरित्या विधानसभा निवडणूक प्रचाराची संयुक्तरित्या घोषणा केली जाईल. तसेच, शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि मित्रपक्ष प्रत्येकी किती जागा लढवणार याबाबतही माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आजघडीला महायूतीत शिवसेना 126, भाजप आणि मित्रपक्ष 162 असे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. अर्थात या वृत्ताला भाजप अथवा शिवसेना या दोन्ही पक्षांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवसस्थान 'मातोश्री' येथे शिवसेना नेते आणि मंत्र्यांची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीला शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. ही बैठक अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, या बैठकीला जात असताना शिवसेना नेते अनिल देसाई यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता शिवसेना-भाजप आणि मित्रपक्ष यांच्यात महायुती 100% होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा होईल का असे विचारले असता, 'आजची बैठक ही विधानसभा निवडणूक तयारीचा पूर्वभाग म्हणून बोलावण्यात आली' असल्याचे सांगत देसाई यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: कोणत्याच पक्षाला मिळणार नाही बहुमत, यंदा बनणार NDA चं सरकार, शिवसेनेच्या संजय राऊत यांचा ठाम विश्वास)

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, 'शिवसेना-भाजप जागावाटपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेच चर्चा करुन घेतील. जागावाटपावर अंतिम चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष किती जागा लढवणार आहेत याबाबत आताच काही सांगता येणार नाही. पण, चर्चा सकारात्मकपणे सुरु आहे. शिवसेना समाधानकारक निर्णयाखेरीज पुढे जाणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समाधानकारकच निर्णय घेतील', असेही देसाई या वेळी म्हणाले.