महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लवकरच केंद्र सरकार औरंगाबाद (Aurangabad), शिर्डी (Shirdi) आणि कोल्हापूर (Kolhapur) येथील तीन विमानतळांना (Airport) अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज, साईबाबा आणि महालक्ष्मी यांचे नाव देणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ही माहिती दिली. नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद विमानतळाचे नाव राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर करण्याची विनंती केंद्राकडे केली होती.
त्यानंतर राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव देण्याची मागणी करणारा औपचारिक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. ठाकरे यांनी नुकतेच सांगितले होते की, केंद्राची मंजुरी लवकरच अपेक्षित आहे. यासह औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून गेले 28 वर्षे वाद सुरु आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये पहिल्यांदा हा नारा दिला होता.
शहराच्या नामांतराचा मुद्दा जरी राजकीय वादात अडकला असला, तरी आगामी नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याचे केंद्राचे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते.
कराड म्हणाले की, औरंगाबाद, शिर्डी आणि कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राने ठेवला असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यांनी नमूद केले की नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कॅबिनेटच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवतील. (हेही वाचा: नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी बांधकामे कायदेशीर करण्याची गावठाणवासीयांची मागणी, रहिवाशांनी स्वतःचे उमेदवार उभे करण्याचे दिले संकेत)
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव बदलाला कडाडून विरोध केला आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव बदलाच्या निर्णयाला राजकीय खेळी म्हटले आहे.