Mahaparinirvan Din: दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे; स्थानकाबाहेर भीम आर्मीचे आंदोलन
दादर स्थानक (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना आदरांजली वाहिली जात आहे. दादरच्या चैत्यभूमी इथेही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता. दादर येथे डॉ.बाबासाहेबांचे निवासस्थान होते. बाबासाहेबांवर जिथे अंतिम संस्कार करण्यात आले ती दादरची जागा चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ करण्याची मागणी करत, डॉ. भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने दादर रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात असून अनेकवेळा या संघटनेने येथे आंदोलने केली आहेत. मात्र, आजपर्यंत त्याकडे लक्ष न दिल्याने कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत मुंबई भीम आर्मीने हे आंदोलन केले. यावेळी सुशीला कपूर, अविनाश गरुड, प्रितेश चितळे, दिनेश शर्मा, सुरेश धाडी, मनीषा उबाळे, विकी शिनगारे, क्रांती खाडे, पंचशीला खराटे, अविनाश सिंदर यांच्यासह मुंबईतील भीम आर्मीचे अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हेही वाचा: Mahaparinirvan Diwas: चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटांमध्ये वाद; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात)

यावेळी ‘जय भीम, जय भीम’, ‘ नामांतरण झालेच पाहिजे झालेच पाहिजे’, ‘होतं कसं नाय झालंच पाहिजे’ अशा घोषणा देत भीम आर्मीचे कार्यकर्ते दादर स्थानकामध्ये शिरले. परिस्थिती चिघळू नये म्हणून त्यांना दादर स्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्यासाठी परवानगी दिली.

दरम्यान, भीम आर्मीने यापूर्वी केंद्र, राज्य सरकार आणि देशाच्या राष्ट्रपतींकडे आपली ही मागणी मांडली होती, असे संघटनेच्या कोअर कमिटीचे प्रमुख राजू झनके यांनी सांगितले. यासंदर्भात तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन देण्यात आल्याचेही झनके यांनी सांगितले. दुसरीकडे महापरिनिर्वान दिनानिमित्त समीर वानखेडेही आज चैत्यभुमिवर दाखल झाले यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याने वाद निर्माण झाला.