नवी मुंबईतील वाशी न्यायालय हे राज्यातील पहिले पेपरलेस म्हणजेच डिजीटल न्यायालय ठरले आहे. ई-फायलिंग आणि डिजिटल कोर्टाची संकल्पना तयार केल्यानंतर वाशी न्यायालयातील वकिलांनी ई-फायलिंगची तयारी दर्शवली. मार्चअखेरपर्यंत या न्यायालयात 762 ई-फायलिंग दाखल झाल्या आहेत. असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी केले. बेलापूर येथे सुरू असलेल्या वाशी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या संकुलामध्ये हे जिल्हा न्यायालय सुरू झाले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. (Shirdi Airport: शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग, दिल्लीहून इंडिगो कंपनीचे पहिले विमान शिर्डीत रात्री उतरणार)
न्यायालयाचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी विशेष प्रयत्न न्यायमूर्ती पटेल यांच्याकडून सुरु करण्यात आले होते. या संकल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र बेलापूर न्यायालयाने सर्वप्रथम पेपरलेस कामकाजाची तयार दाखवली. या ठिकाणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकार आणि वकिलांचा वेळ वाचणार आहे.
याप्रसंगी ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अभय मंत्री, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबईचे सत्र न्यायाधीश पराग साने, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य गजानन चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.