शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) आता साईभक्तांसाठी नाईट लँडिंगचीही (Night Landing) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी दाखल होणाऱ्या लाखो साईभक्तांसाठी (Sai Baba) या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. शिर्डी विमानतळावर यापुर्वी फक्त दिवसा विमान लँडिंगची परवानगी होती. आता नाईट लँडिगची परवानगी आणि सुविधा मिळाल्याने देशभरातून शिर्डीला येणाऱ्या पर्यटकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. दिल्लीहून इंडिगो कंपनीचे (Indigo) पहिले विमान रात्री आठ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर उतरणार आहे.
2017 ला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण झाले होते. यानंतर या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिर्डीमध्ये हजारो साईभक्त रोजच दर्शनासाठी येतात. यासेवेमुळे त्यांच्या वेळेची बचत होत होती आणि आता नाईट लँडिंगची सुविधा मिळाल्यामुळे देखील लोकांना या सेवेचा फायदा होणार आहे. विशेष करुन साई मंदिरात काकड आरतीला उपस्थिती लावणाऱ्या भाविकांना या सेवेचा फायदा होणार आहे. आतापर्यंत हैदराबाद, चैन्नई, दिल्लीसह बंगलोर इथून येणाऱ्या विमानांना मोठा प्रतिसाद मिळत असून नाईट लँडिंग सुविधा सुरु झाल्यावर अनेक नवीन विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला देखील गती मिळण्याची चिन्ह आहे.