Lok Shabha Elections 2024: नागरिक NGSP पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Lok Sabha Elections | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Shabha Elections 2024) मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार 914 नागरिकांनी कॉलद्वारे म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार 928 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टलद्वारे (NGSP) नोंदविता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त तक्रारींपैकी 942 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, तर 36 तक्रारींच्या निराकरणाचे काम सुरू आहे. आठ तक्रारी निराकरणाच्या प्राथमिक प्रक्रियेत आहेत.

नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले हे पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर अथवा https://tmp.eci.gov.in/electors या लिंकवर तक्रारी स्वीकारल्या जात आहेत.

या संदर्भातील तक्रारी करू शकता-

मतदार नोंदणी, मतदान केंद्राची ठिकाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), निवडणूक खर्च, निवडणूक गैरव्यवहार, यासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात. आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोर्टल उपलब्ध आहे. हे पोर्टल निवडणूक-संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सुलभ झाले आहे. पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाईल याची खात्री नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिक त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतात. हे पोर्टल एखाद्या नागरिकाने त्याच्या प्रोफाइलमध्ये नोंदवलेल्या सर्व तक्रारींची नोंद ठेवते. तक्रार नोंदवल्यानंतर, संदर्भ आयडी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई- मेल आयडीवर पाठविला जातो. तक्रार दाखल केल्यानंतर ती योग्य निवडणूक अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवली जाते. अधिकाऱ्याने कालबद्ध कालावधीत तक्रारीला प्रतिसाद देणे आवश्यक असते. (हेही वाचा: NCP Party Manifesto: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला जाहीरनामा; जाणून घ्या आश्वासने व ठळक मुद्दे)

या सोप्या पद्धतीने तक्रार करू शकता-

एनजीएसपी या संकेतस्थळावर गेल्यानंतर 'रजिस्टर कंप्लेंट' बटणावर क्लिक करावे. त्यांनतर तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे ते निवडावे. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा, जसे की तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क माहिती. त्यांनतर तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा. कोणतेही समर्थन दस्तऐवज अपलोड करा (असल्यास). “सबमिट” बटणावर क्लिक करा. एकदा तुम्ही तुमची तक्रार सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ई- मेल पुष्टीकरण मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in/ या लिंकचा वापर करू शकता, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.