अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापूर (Indapur) मध्ये एका सभेमध्ये बोलताना विकास निधी वरून केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते. विरोधकांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली. या वक्तव्यावरून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं म्हणत क्लीनचीट दिली आहे. या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.
इंदापूर मध्ये बोलताना अजित पवारांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा अन्यथा हात आखडता घेतला जाईल असं विधान केलं होतं. दरम्यान अजित पवारांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण.
अजित पवारांनी या विधानावरून चर्चा झाल्यानंतर आपलं स्पष्टीकरण देताना आपण प्रचार सभेत नव्हे तर एका वकील, डॉक्टरांच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये बोलत होतो. तसेच कचाकचा बटणं दाबणं हा ग्रामीण भागातील शब्दप्रयोग आहे. पुण्यात इंदापूर मध्ये बोलत असताना त्यांच्याच भाषेत बोललो त्यामुळे कचाकचा शब्द वापरल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा विकासनिधी देणार पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे अजित पवार म्हणाले होते.