Lok Sabha Elections 2024:  'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण
Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

अजित पवारांचा (Ajit Pawar) दिलखुलास अंदाज अनेकदा त्यांना अडचणीमध्ये आणतो. काल त्यांनी इंदापूर (Indapur) मध्ये केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात बोलत असताना अजित पवार यांनी 'मतदान यंत्राची बटणं कचा कचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल नाहीतर हात आखडता येईल.' या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान या विधानावरून चर्चा वाढायला लागल्यानंतर त्यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार यांनी आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. 'कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. ते वक्तव्य गंमतीने आणि हसत हसत केले होते. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते.' अशी सारवा सारव अजित पवारांनी केली आहे. 'राहुल गांधी परवा म्हणाले की आम्ही तुमच्या बँक खात्यात खटाखट पैसे टाकू तसं मी आमच्या ग्रामीण भाषेत म्हणालो की कचा कचा बटणं दाबा.'

अजित पवारांचं विधान

दरम्यान अजित पवारांच्या विधानानंतर त्यांच पुतणे आणि शरद पवार गटाच्या एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी देखील X वर पोस्ट करून निवडणूक आयोगाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

'कोणता पक्ष जाहीरनाम्यात सांगतो, आम्ही असं करणार तसं करणार. ते काही प्रलोभन दाखवणार का? विकासकामांना निधी देण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे त्यामुळे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की आतापेक्षा जास्त निधी आणि जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसेच आचारसंहितेचा भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी घेत असतो. असेही अजित पवार म्हणाले.