Lok Sabha Elections voting | (Only representative image)

Re-polling in 4 centres of Gadchiroli- Chimur constituency: गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यातील एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील नक्षलप्रभावीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वटेली (Watali), गर्देवाडा (Garadewada), पुस्कोटी (Pusosoti), वांगेतुरी (Wangeturi) या गावांतील चार मतदान केंद्रांवर आज (सोमवार, 15 एप्रिल) फेरमतदान पार पडत आहे. 11 एप्रिल रोजी या परिसरात मतदान पार पडले होते. मात्र, नक्षली कारवायांमुळे या मतदान केंद्रांवर मतदान पार पडू शकले नव्हते. त्यामुळे या भागामध्ये फेरमतदान घेण्यात येत आहे. फेरमतदान होत असलेली मतदान केंद्रं ही गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात येतात. या ठिकाणी भाजपकडून अशोक नेते, काँग्रेसकडून नामदेव उसंडी तर, वंचित बहुजन आघाडीकडून रमेश गजबे रिंगणात आहेत.

सुरक्षा व नक्षली कारवाया आदी कारणांमुळे जिल्हा प्रशासनाने या गावांतील मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेतले जात आहे. सकाळी सात वाजल्यापासून या मतदान केंद्रांवर मतदान सुरु झाले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत या मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदान करता येणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: गडचिरोली येथे उद्या चार मतदान केंद्रावर होणार मतदान)

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी माओवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे अवाहन मतदारांना केले होते. तसेच, नक्षली कारवाया करत एटापल्ली तालुक्यातील गट्टा, पुरसलगोंदा आणि वाघेझरी येथे भूसुरुंग व आयडी स्फोट घडवले होते. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहनी झाली नाही. पण, सीआरपीएफ आणि पोलीस दलातील अनेक जवान मात्र, मोठ्या प्रमाणावर जखमी झाले होते. एकूण स्थिती पाहता नैसर्गिक आणि दळवणाच्या दृष्टीकोनातून विचार करता मतदान केंद्रांवर सुरक्षा पथक पाठवणेह हे अत्यांत धोकादायक होते. त्यामुळे हा धोका न पत्करता मतदान त्या दिवशी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.