Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु असून, महाराष्ट्रासह देशभरातील जनमताचा कौल बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे. देशातील जनतेचा कौल हा भाजप आणि एनडीएच्या बाजूने दिसत आहे. तर, काँग्रेस आणि यूपीएसाठी जनमत धक्कादायक आहे. महाराष्ट्रातही हे निकाल अत्यंत धक्कादायक लागले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज चेहऱ्यांनाही पराभवास सामोरे जावे लागले आहे. यात अशोक चव्हाण, सुशिल कुमार शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांचा तर, पार्थ पवार, राजू शेट्टी, अनंत गिते यांच्यासारख्या दिग्गज चेहऱ्यांचाही समावेश आहे. जाणून घ्या कोण आहे ते या दिग्गज चेहऱ्यांना पराभूत करणारे 'जायंट किलर'
मावळ लोकसभा मतदारसंघ
श्रीरंग बारणे, शिवसेना
शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा पराभव केला. पार्थ पवार यांची कौटुंबीक राजकीय पार्श्वभूमी पाहता पश्चिम महाराष्ट्रातील ही प्रचंड मोठी राजकीय लढाई होती. त्यामुळे श्रीरंग बारणे हे जायंट किलर ठरतात. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार यांच्या पराभवाची कारणे; राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का)
हातकणंकले लोकसभा मतदारसंघ
धैर्यशील माने, शिवसेना
शिवसेनेच्या धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव केला. हातकंगणे मतादरसंघातून राजू शेट्टी हे दोन वेळा निवडूण आले आहेत. या वेळी त्यांची तिसरी टर्म होती. मात्र, हॅट्रीक मिळविण्याच्या विचारात असतानाच धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्या विजयाला खिळ घातली. या लढतीकडेही महाराष्ट्राचे लक्ष होते.
नांदेड लोकसभा मतदारसंघ
प्रतापराव चिखलीकर, भाजप
भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव केला. अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पहिल्यांदाच पराभव पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्र्याचा आणि त्यातही काँग्रेसच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षाचा पराभव हा राजकीय वर्तुळाती सर्वात मोठी हिट विकेट ठरली आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रात पिछाडीवर असलेले प्रमुख चेहरे; दिग्गजांना धक्का)
सोलापूर लोकसभा मतदारसंघ
जयसिद्धेश्वर स्वामी, भाजप
भाजपच्या जयसिद्धेश्व स्वामी यांनी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे इथे चुरस निर्माण झाली होती. मात्र, अटीतटीच्या लढतीमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला. शिंदे यांचा पराभव झाला.
रायगड लोकसभा मतदारसंघ
सुनिल तटकरे, राष्ट्रवादीकाँग्रेस
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी शिवसेना उमेदवार अनंत गिते यांचा पराभव केला. अनंत गिते हे गेली अनेक वर्षे या जागेवरुन निवडूण येत होते. तसेच, मोदी सरकारमध्ये 2014 ते 2019 या काळात ते शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री होते. त्यांचा पराभव तटकरे यांनी केला. त्यामुळे तेही जायंट किलर ठरले आहेत.