Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेत नाराजी, अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर; राजीनामासत्र सुरुच
Photo Credit - X

Lok Sabha Election 2024 : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे( Raj Thackeray ) यांनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेला उतरती कळा लागल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर एकीकडे जरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहात असला तरी दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. दर पाच वर्षात राजकीय भूमीका बदलण्याचे वर्तूळ राज ठाकरे यांनी पुन्हा पूर्ण केल्याचं म्हणत काहींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

२०१९ मध्ये राज यांनी मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. ठिकठिकाणी जाहीर सभांमध्ये व्हिडीओंच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले होते. अगदी मोदी यांच्या गावातील स्वच्छतागृहांच्या अवस्थेबद्दलही त्यांनी ताशेरे ओढले होते. त्याच राज यांना मोदी यांचे नेतृत्व आता खंबीर वाटू लागले आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. प्रखर विरोध करणारेही स्वार्थासाठी एकत्र आल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे विरोधकांनी म्हटले आहे.

डोंबिवलीतील तर मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी मनसेच्या सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत असल्याने मी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिल्याचे दवते यांनी संगितलं. त्याशिवाय, राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे युवा नेते अमित ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.