Lok Sabha Election 2024: भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे, बीड येथून बजरंग सोनावने, शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर
Sharad Pawar Party Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआगाडीमध्ये सांगली, भिवंडी (Bhiwandi) आणि मुंबईतील एका जागेवरुन जोरदार संघर्ष होता. काँग्रेसचा दावा असतानाच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली येथून चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केले. भिवंडीवरही काँग्रेसचा दावा होता मात्र आता तेथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Balya Mama aka Suresh Mhatre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातही शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला. शरद पवार गटाने आज लोकसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली.

बीड लोकसभा मतदारसंघ गोपीनाथ मुंडे हायात होते तेव्हापासून चर्चेत आहे. मुंडे यांच्या पश्चात या ठिकाणी भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे प्राबल्य राहिले आहे. पंकजा यांच्या भगिणी प्रणिती मुंडे या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत. तर भाजपने या वेळी पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गट या ठिकाणी कोणाला उमेदवारी देतो याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत होते. दरम्यान, सर्व चर्चांना पूर्णविराम देत जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या वतीने बजरंग सोनावने यांचे नाव जाहीर केले आहे. (हेही वाचा, Hemant Patil and Bhavna Gawali: शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे, भावना गवळी यांचा पत्ता कट, एकनाथ शिंदे यांची 'ठाणे'दारी राहणार?)

दुसऱ्या बाजूला भिवंडी लोकसभा मतदारसंघही महाविकासआघाडीमध्ये जोरादर चर्चेत होता. या ठिकाणी काँग्रेसने हक्क सांगितला होता. या जागेवरुन आघाडीत काही प्रमाणावर मतभेदही पाहायला मिळत होते. मात्र, आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला सुटली. या ठिकाणी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (हेही वाचा, Unmesh Patil Quit BJP Join Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांचा भाजपला धक्का; उन्मेश पाटील यांचा शिवसेना (UBT) प्रवेश)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत 7 उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ खालील प्रमाणे

  • वर्धा- अमर काळे
  • दिंडोरी- भास्कर भगरे
  • बारामती- सुप्रिया सुळे
  • शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
  • अहमदनगर- निलेश लंके
  • बीड- बजरंग सोनवने
  • भिवंडी- सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

एक्स पोस्ट

दरम्यान, बारामती, सिरुर, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण शरद पवार गट, अजित पवार गट आणि सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी या जागा प्रचंड प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.