कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम ठेवण्यात आल्याचे परिपत्रक जारी केले आहे. परंतु, 'मिशन बिगीन अगेन' (Mission Begun Again) अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्र्रात लॉकडाऊन की अनलॉक? असाही सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने 'मिशन बिगन अगेन' अंतर्गत आधीच्या बऱ्याच सवलती कायम राहतील, असे सोमवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. आता अधिक सवलती दिल्या जातील असा अंदाज होता. सरकारने तशी तयारी केलीही होती. परंतु गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने बंधने कायम ठेवताना, काही नवे निर्बंध घातले आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे "भ्रमित ठाकरे" सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे, अशा आशायाचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हे देखील वाचा- गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल, शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण
चंद्रकांत पाटील यांचे ट्विट-
महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक ?
अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे "भ्रमित ठाकरे" सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 1, 2020
महाराष्ट्रात बुधवारी संध्याकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 74 हजार 761 वर पोहचली होती. यापैकी 90 हजार 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, राज्यात आता एकूण 75 हजार 979 रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचे माहिती, राजेश टोपे यांनी दिली होती.