Maharashtra Police | (Photo Credits: Maharashtra Police & Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज (सोमवार, 4 मे 2020) सुरु झाला. देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेता लॉकडाऊन (Lockdown) आणखी किती दिवस कायम राहणार याबाबात निश्चिती नाही. दरम्यान, लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी आणि कोरोना व्हायरस संकटाच्या छायेतून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अशा स्थितीत केवळ हाता दंडूका घेत रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणीच नव्हे तर, सोशल मीडियाचा खुबीने वापर करुनही पोलीस मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लहानणीच्या शिकवणीचे स्मरण दिले आहे. 'बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा' असे म्हणत पोलिसांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन याबाबत संदेश दिला आहे. 'बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा' अशी अक्षरे असलेली एक टेक्स्ट इमेज शेअर करतानाच त्यासोबत आठवतेय लहानपणची शिकवण? आता त्यावर अमल करण्याची वेळ आली आहे. कोरोनाव्हायरस जाण्याची आणि चांगले दिवस येण्याची वाट बघूया- लॉकडाऊन संपेपर्यंत घरीच राहूया, असा मजकूर असलेली पोस्टही पोलिसांनी लिहिली आहे. शिवाय त्यासोबत #जातो_नाही_येतो असा हॅशटॅगही दिला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात कलम 188 नुसार 91 हजरांपेक्षा अधिक गुन्हे दाखल; 18 हजार 48 जणांना पोलिसांकडून अटक)

'बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा' या वाक्याचा संदर्भ असा की, ग्रामीण भागात आणि शहरांतील काही कुटुंबामध्ये आजही शिकवण दिली जाते. घरातून कोणी बाहेर जात असेल तर जाऊ का किंवा जातो असे न म्हणता येतो असे म्हणावे. खास करुन लहान मुलांना ही शिकवण दिली जाते. जी पुढे आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर पाळली जाते. याचाच संबंध लॉकडाऊनशी लावत पोलिसांनी 'बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा' असा संदेश दिला आहे.

महाराष्ट्र पोलीस ट्विट

कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन एक जबाबादार नागरिक म्हणून आपण अधिक गांभीर्याने घ्यायला हावा. कारण, ताज्या आकडेवारीनुसार राज्यात आज घडीला कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 12974 इतकी आहे. यापैकी 10311 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर कोरोना व्हायरस संक्रमित 548 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा झालेल्या आणि बरे वाटून रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) मिळालेल्या रुग्णांची संख्या 2115 इतकी आहे.