महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात कलम 188 नुसार 91 हजरांपेक्षा अधिक गुन्हे दाखल; 18 हजार 48 जणांना पोलिसांकडून अटक
| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असल्याते नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक कारणे देऊन लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात कलम 188 नुसार 91 हजार 217 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 18 हदार 48 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

नागरिकांना वारंवार घरात राहण्यास सांगितले तरीही ते ऐकत नसल्याचे दिसुन येत आहे. भाजी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. आता पर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या 1255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 51 हजार 719 वाहने जप्त करण्यात आली आहे. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.(मुंबई: वांद्रे कुर्ला संकुलन येथे MMRDA च्या मैदानात 1 हजार बेड्सचे COVID19 रुग्णांसाठी रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरुवात)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही गोष्टी सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देशात येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.