Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉक डाऊन (Lockdown) नंतर राज्यात अनलॉक 2 (Unlock 2) ची प्रक्रिया सुरु झाली. मात्र अजूनही कोरोना विषाणू रुग्णवाढीचे प्रमाण घातले नाही, त्यामुळे राज्यातील लॉक डाऊन 31 जुलै पर्यंत लागू करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यातील जिल्ह्यांनीही आपापल्या जिल्ह्यातील लॉक डाऊन वाढवला. आता ठाणे जिल्ह्यातील लॉकडाऊमध्येही वाढ करण्यात आली आहे. टीएमसी (TMC) ने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात आता 19 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

या आधी एक नोटिफिकेशन जारी करत, ठाणे महानगरपालिका हद्दीत दि. 2 जुलै 2020 रोजी सकाळी 7 ते दि.12 जुलै 2020 सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता यामध्ये वाढ करून हे लॉक डाऊन 19 जुलै 2020 पर्यंत लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा: पुण्यात येत्या सोमवार पासून 15 दिवस कडकडीत बंद; पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा)

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या नवीन नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे,  ‘आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढविणे गरजेचे आहे,अशी आयुक्त ठाणे महानगरपालिका यांची खात्री झाली आहे. त्यानुसार साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या सर्व संबंधित तरतुदींसह प्राप्त अधिकारांचा वापर करुन, आयुक्त ठाणे महानगरपालिका, हे दि. 12/07/2020 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दि. 19/7/2020 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यत संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन जाहीर करत आहेत.’

महत्वाचे म्हणजे यामध्ये केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान याआधी पुणे, औरंगाबाद, नांदेड याठिकाणी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, काल ठाणे महानगरपालिकेत 348 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णांची संख्या 4747 वर पोहोचली आहे.