Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) हाहाकाराला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन (Lock Down) जाहीर करण्यात आले आहे. अशा वेळी कुठेतरी अडकून बसण्याऐवजी आपल्या गावी जाऊन राहावे यासाठी डोंबिवलीतील (Dombivli) पाटील कुटुंब कोल्हापूर (Kolhapur) शाहूवाडीतील (Shahuvadi) जांबुर ला जाण्यासाठी बाईकवरून निघाले होते, मात्र प्रवासाच्या मध्येच त्यांच्या बाईकचा एका भीषण अपघात होऊन यात पत्नी, पती सह 6 वर्षाच्या चिमुकल्याचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सर्जेराव भीमराव पाटील (वय ३३), पूनम सर्जेराव पाटील (वय 27 ) आणि त्यांचा मुलगा अभय सर्जेराव पाटील (वय 6) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत पायी जाणा-या 5 मजुरांचा मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार 24 मार्च रोजी पाटील कुटुंब गावी जाण्यासाठी निघाले होते, साहजिकच ट्रेन, बस सर्व काही बंद असल्याने त्यांना प्रवासासाठी काहीच पर्यायी मार्ग नव्हता म्हणून त्यांनी आपल्या बाईकवरून ट्रिपल सीट जाण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार कराड पर्यंतचे अंतर या तिघांनी कसेबसे पार केले. मात्र पुढे 4 - 5 किमी असणाऱ्या शेडगेववाडीच्या जवळच पाटील यांचे आपल्या बाइकवरचे नियंत्रण सुटले आणि बाईक थेट रस्त्याच्या कडेला जाऊन घसरली. यामध्ये तिघांनाही गंभीर दुखापत झाली होती मात्र तरीही त्यांचे श्वास सुरु होते. स्थानिकांनी या तिघांना तात्काळ कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र हॉस्पिटल मध्ये पोहचताच 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, सर्जेराव आणि त्यांची पत्नी पूनम हे दोघेही बेशुद्ध होते. उपचार सुरू असताना बुधवारी सर्जेराव यांचा तर शुक्रवारी पूनम यांचा मृत्यू झाला. सर्जेराव आणि अभय यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंसंस्कार केले. तर पूनम यांच्या पार्थिवावर शुक्रवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. साहजिकच यामुळे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच जांबुर येथे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.