Local Body Elections in Maharashtra: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जानेवारीत महिन्यात होणार असल्याचं वृत्त तथ्यहीन; मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
Mantralay | (File Photo)

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक सह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या आहेत. या निवडणूका कधी होणार? असा प्रश्न सतावत आहे. सध्या प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू आहे. अशामध्येच काही प्रसारमाध्यमांनी राज्यात या प्रतिक्षित नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणूका जानेवारी 2023 मध्ये होतील असा अंदाज वर्तवला होता. पण यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाने आपलं स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या अंतिम सुनावणीनंतरच होणार आहेत. त्यांच्या निकालावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि निवडणूकाचं बिगुल वाजेल.

बीएमसी निवडणूकांसाठी सारेच पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूका कधी होणार? हा प्रश्न सार्‍यांना पडला आहे. अशामध्ये जानेवारीत निवडणूक होईल असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केले होते पण निवडणूकांबाबत केवळ देव आणि न्यायालय यांनांच माहित असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

महाराष्ट्रात मे 2022 मध्ये सत्तांतर आले. सत्तेतून महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारने कारभार हाती घेतला. दरम्यान सत्ता बदलली तसा काही निर्णयांमध्येही बदल झाला. वॉर्ड रचना बदलली गेली. या वरून सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 2017 प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे.