Photo Credit - X

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. काल 23 तारखेला मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला कौल दिला. लाडक्या बहिणींनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला. भारतीय जनता पक्ष (BJP) हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. काहिंना लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं. तर काहींना कमी मताधिक्क्याने विजय मिळाला. यात बड्या राजकारण्यांची नावे आहेत. (हेही वाचा: Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी)

शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पवार कुटुंबाचे तरूण नेतृत्व रोहित पवार या दिग्गजांचा समावेश आहे. हे निकाल पाहून राज्यातील सर्वांना धक्का बसला आहे. सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवाराला 1,45,944 मतांच्या फरकाने विजय मिळाला, तर सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या उमेदवाराला 162 मताधिक्क्य मिळाले. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election Results: पृथ्वीराज चव्हाण ते झीशान सिद्दीकी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' मोठ्या नेत्यांचा पराभव, पहा यादी)

नाना पटोले: विदर्भातील निवडणुकीत पक्षाच्या बाजूने बदल घडवून आणण्याची अपेक्षा असलेले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष साकोलीची आपली जागा जेमतेम राखू शकले. भाजपचे अविनाश आनंदराव ब्राह्मणकर यांच्या विरोधात ते केवळ 208 मतांनी विजयी झाले.

रोहित पवार: लोकसभा निवडणुकीत पवारांच्या नेतृत्वाखालील गटाच्या यशामागे महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जाणारे राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या नातवाने कर्जत-जामखेडची आपली जागा राखण्यासाठी धडपड केली. अखेर त्यांनी भाजपचे राम शंकर शिंदे यांच्या विरोधात 1,243 मतांनी विजय मिळवला.

मुफ्ती मोहम्मद खलीक: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे नेते, मालेगावचे विद्यमान आमदार आसिफ शेख रशीद यांनी मुफ्ती मोहम्मद खलीक यांच्या विरोधात निवडणूक लाढवली. मुफ्ती मोहम्मद खलीक यांनी 162 मतांनी जागा राखत विजय मिळवला. हा फरक या निवडणूकीतला सर्वात कमी फरक आहे.

मंदा म्हात्रे: बेलापूरच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) च्या नेत्या मंदा म्हात्रे यांचा या यादीत समावेश आहे. संदीप नाईक यांच्याशी त्याची लढत झाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची झालेली ही निवडणूक अखेर म्हात्रे यांनी अवघ्या 377 मतांनी जिंकली.

दिलीप वळसे पाटील: माविआ सरकारमधील मंत्री राहिलेले, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 1,523 मतांनी विजयी झाले. त्यांना शरद पवार गटातील देवदत्त निकम यांना सामोरे जावे लागले.

महेश सावंत: माहिम विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली. माहीमची निवडणूक हाय-प्रोफाइल निवडणूक ठपली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी विजयाचा गुलाल उधळला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महेश सावंत यांचा 1,316 मतांनी विजयी झाला.

अनंत नर: जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा वायकर तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनंत नर यांना मैदानात उतरवले होते. यात अनंत नर यांनी मनीषा रवींद्र वायकर यांच्या विरोधात 1,541 मतांनी विजय मिळवला.

साजिद खान पठाण: अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस नेते 1,283 मतांनी जिंकले. भाजपचे विजय अग्रवाल हे पराभूत ठरले.

संजय रामभाऊ गायकवाड : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (महायुती) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा 661 मतांनी पराभव करीत विजयश्री अक्षरशः खेचून आणला.

भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश असलेल्या महायुतीने 288 जागांपैकी 235 जागांवर एकत्रितपणे विजय मिळवून राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल अभूतपूर्व होता. काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचा विरोधी गट केवळ ४९ मतदारसंघांवर कमी झाला.