Prithviraj Chavan, Zeeshan Siddique (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Results) निकालांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीच्या वादळासमोर महाविकास आघाडी तग धरू शकली नाही. युतीच्या या मोठ्या विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निकालावर नाखुशी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आहेत, असे ठाकरे म्हणाले.

महायुतीची भक्कम बहुमताकडे वाटचाल सुरू असताना या निवडणुकीत अनेक मोठे चेहरे प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा समावेश आहे.

निवडणूक हरलेले मोठे चेहरे-

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला जनतेची सहानुभूती मिळू शकली नाही. वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांचा शिवसेना-यूबीटी नेते वरुण सतीश सरदेसाई यांच्याकडून पराभव झाला आहे.

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे देखील आमदार होण्यास मुकले. त्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक यांनी पराभव केला आहे. सना नवाब मलिक यांची मुलगी आहे.

नवाब मलिक यांचा मानखुर्द शिवाजी नगर जागेवर अबू आझमी यांच्याकडून पराभव झाला आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांचाही निवडणुकीत पराभव झाला. लातूर ग्रामीणमधून धीरज विलासराव देशमुख यांचा भाजपचे रमेश काशीराम कराड यांनी पराभव केला आहे.

माहीममधून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा पराभव झाला. अमित ठाकरे यांचा शिवसेना-यूबीटी नेते महेश सावंत यांच्याकडून पराभव झाला आहे. त्यांचा 17151 मतांच्या फरकाने पराभव झाला.

मुंबादेवी मतदारसंघातून शिवसेनेच्या शाईना एनसी यांचाही पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी 35505 मतांनी पराभव केला. (हेही वाचा: Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)

शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक पराभूत झाले आहेत. त्यांचा काका अजित पवार यांच्याकडून 100899 मतांनी पराभव झाला. युगेंद्र यांना 80233 मते मिळाली.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील जयश्री पाटील यांचा सांगलीतून पराभव झाला आहे. त्यांचा भाजपच्या सुधीरदादा गाडगीळ यांनी पराभव केला आहे.

कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला आहे. त्यांचा भाजपच्या अतुलबाबा भोसले यांच्याकडून 39355 मतांनी पराभव झाला.

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे 8 वेळा संगमनेरचे आमदार राहिले आहेत. त्यांनी 9व्यांदा निवडणूक लढवली पण आता त्यांचा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अमोल खताळ यांच्याकडून पराभव झालां आहे.