प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दिनांक 15 फेब्रुवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे एक महिला जळाल्याचे घटना घडली होती. प्रेम प्रकरण व त्यानंतर लग्नाला नकार यामुळे ही घटना घडली होती. त्यानंतर पिडीतेवर मुंबईमधील मसीना बर्न हॉस्पीटल येथे उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान पिडीतेचा मृत्यू झाला आहे. गेले एक आठवडा या महिलेवर उपचार सुरु होते.

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक केलेली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. जेजे हॉस्पिटल येथे शवचिकित्सा झाल्यानंतर लासलगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरुवातीला, या प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवत यानेच या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. मात्र त्यानंतर पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार, रामेश्वर व या पिडीतेचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. परंतु त्यानंतर या तरुणाचा साखरपुडा दुसऱ्या एक तरुणीशी झाला यावरून या दोघांमध्ये खटके उडत होते. 15 फेब्रुवारी रोजी लासलगाव बस स्थानकाजवळ पिडीता उभी असता तिथे रामेश्वर आला व पुन्हा या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. (हेही वाचा: नाशिक: लग्नाला नकार दिल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले; लासलगाव जळीत कांडातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल)

पिडीता गाडीत पेट्रोल भरत होती. झटापटीत हे पेट्रोल दोघांच्याही अंगावर सांडले. त्यानंतर रामेश्वरने काडी स्वतःच्या अंगाकडे पेटवून घेतली, झटापटीत ती पिडीतेकडे आली आणि आग लागली. पिडीता पेटली व रामेश्वर तिथून पळून गेला. अशाप्रकारे, दोघांच्या झटापटीत आपल्या अंगावर पेट्रोल सांडल्याने मी पेटले, त्याचा मला जाळण्याचा उद्देश नव्हता, असा दावा खुद्द पीडितेनेच केला आहे. त्यानंतर फरार मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवतला येवला तालुक्यात अटक करण्यात आली. आपण तिच्यासोबत विवाह करण्यास नकार दिल्यानेच तिने स्वत:ला पेटवून दिल्याचा दावा या प्रकरणातील आरोपीने केला आहे. आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.