
Majhi Ladki Bahin Yojana: सध्या विरोधकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना (Majhi Ladki Bahin Yojana) बंद पडणार असल्याचं सांगितलं जातं आहे. आता ही योजना बंद पडणार असल्याच्या अटकळांदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहिन योजनेसंदर्भात मोठं अपडेट दिलं आहे. ही याजना सुरूच राहील, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांना वचन दिलेली आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक महिलांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल - अजित पवार
कालच, मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे. यावेळी पीक विमा योजनेतील अनियमिततेबद्दलही पवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांत विमा संरक्षण देण्यात येत असताना, कुरण आणि सरकारी जमिनीवर दावे केले जात होते. अशा योजनांचा योग्य वापर अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी केला पाहिजे, असं मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. (हेही वाचा - Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश)
दरम्यान, जालना जिल्ह्यातील परतूर येथील माजी आमदार सुरेश जेठलिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी परतूरचे नेते सुरेश जेठलिया यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही भ्याडपणाचे राजकारण करत नाही आहोत. हा शिव-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आम्हाला ती परंपरा कायम ठेवायची आहे.