Lockdown: लॉकडाउनमध्ये पुण्याहून परभणीकडे पायी निघालेल्या एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा अन्न-पाण्याविना मृत्यू
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) करण्यात आलेल्या लॉकडाउनचा (Lockdown) सर्वाधिक फटका हा स्थलांतरित कामगार आणि मजूरांना बसला आहे. लॉकडाउन दरम्यान अनेक स्थलांतरित मजुराने आपल्या घरी परतण्यासाठी पायी चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. यातच पुण्याहून (Pune) परभरणीकडे (Parbhani) पायी निघालेल्या एका 40 वर्षीय मजुराचा (Farm Labourer) मृत्यू झाला आहे. या उसतोड कामगाराचा पायी चालत असताना भूक आणि डिहायड्रेशनमुळं मृत्यू ओढवला आहे, अशी माहिती इंडियन एक्प्रेसने दिली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पिंटू पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पिंटू हा परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील धोपटे पोंडूल गावचा रहिवासी होता. तसेच पुणे जिल्ह्यात ऊसतोड कामगार म्हणून तो काम करीत होता. लॉकडाउनची घोषणा झाल्यानं खाण्यापिण्याचे हाल व्हायला लागल्यानंतर पिंटू पुण्यात आपल्या भावाच्या घरी राहण्यासाठी गेला. दरम्यान, लॉकडाउन लवकर मिटण्याची चिन्हे दिसेनात त्यामुळे पिंटूने पायीच आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने पुण्याहून ८ मे रोजी आपला प्रवास सुरु केला. दरम्यान, 14 मे रोजी तो अहमदनगर येथे पोहोचला. त्यानंतर तो पुढे बीड जिल्ह्यातील धानोरापर्यंत 30 ते 35 किमी चालत गेला आणि एका छोट्या शेडखाली विश्रांतीसाठी थांबला. त्यावेळीच त्याचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमत्र्यांना सुचवला 'हा' जालीम उपाय

कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांची गैरसोय होत असल्याची बोलले जात आहे. यामुळे काहीजणांनी पायपीट करत आपल्या घरचा रस्ता धरला आहे. परंतु, पायपीट करत जात असताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहे.