Pani Puri | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पाणीपुरी ( Pani Puri) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातही चटकदार आणि खंमंग पाणीपुरी म्हटलं की खवय्यांना कधी एकदा जाऊन पाणीपुरी खाऊ असं होतं. पण हीच पाणीपुरी बनवताना चक्क सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी (Toilet Water) वापरल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहरातील रंकाळा तलाव (Rankala Lake) परिसरातील एका पाणिपूरी विक्रेत्याने (Pani Puri Vendor) हा किळसवाना प्रकार केला आहे. या घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी या विक्रेत्याच्या पाणीपुरी गाडीची तोडफोड केली. तसेच, त्या विक्रेत्यालाही महाप्रसाद दिला.

कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळ असलेल्या रंगाळा येथे खराडे कॉलेज समोर पाणीपुरी विकत असलेल्या विक्रेत्याकडून हे कृत्य घडले आहे. टीव्ही 9 ने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार एक पाणीपुरी विक्रेता सार्वजनिक शौचालयाबाहेर असलेल्या नळाला 20 लिटटर पाण्याची कॅन भरुन घेतो. ही कॅन खांद्यावर घेऊन तो तडक रंकाळा परिसरात असलेल्या आपल्या पाणीपुरीच्या गाड्यावर जातो. या कॅनमधील काही पाणी तो पाणिपुरीसाठी वापरतो. तर काही पाणी ग्राहकांना पिण्यासाठी ठेवतो. हा किळसवाणा प्रकार पाहून कोल्हापुरकरांच्या रागाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी या पाणिपुरीवाल्याला हिसका दाखवला. (हेही वाचा, अहमदनगर: पाणीपुरीच्या ठेल्यावरील पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या)

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीने आगोदर लॉकडान सुरु आहे. हा लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. त्यात कोणताही धोका न पत्करता राज्य सरकार सर्व नियम आणि अटी घालून विविध व्यवसाय, सेवा सुरु करण्यास परवानगी देत आहे. त्यामुळे अतिशय काळजी घेण्याचा काळ असताना सर्वच व्यवसायिकांकडून नागरिक आणि ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. असे असतानाही व्यावसायिक अशा प्रकारचा गलथानपणा आणि कृत्य करत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.